महामानवाच्या संघर्षातील निःशब्द सावली : माता रमाई

२७ मे हा दिवस भारतीय सामाजिक इतिहासातील अत्यंत भावनिक आणि स्मरणीय दिवस आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासातील सर्वात मोठी आधारवड ठरलेल्या माता रमाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा हा दिवस. बाबासाहेबांच्या विराट कार्यामागे अनेक त्याग, संघर्ष, वेदना आणि नि:शब्द समर्पण दडलेले आहे. त्या त्यागाच्या केंद्रस्थानी उभे असलेले नाव म्हणजे माता रमाई. बाबासाहेबांचे जीवन म्हणजे हिमालय; पण त्या हिमालयाला थंड सावली देणारी, संकटांत खंबीरपणे उभी राहणारी सावली म्हणजे रमाई.

७ फेब्रुवारी १८९७ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळजवळील वनंद गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात रमाईंचा जन्म झाला. त्यांचे वडील भिकू धोत्रे (वलंगकर) तर आई रुक्मिणी होत्या. नदीकाठी असलेल्या महारपुरा वस्तीत त्यांचे बालपण गेले. त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ होता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडील दाभोळ बंदरावर माशांच्या टोपल्या वाहून नेण्याचे काम करत असत. गरिबी, उपासमार आणि संघर्ष हेच त्यांच्या बालपणाचे साथीदार होते.

अजून बालवयात असतानाच रमाईंच्या आयुष्यात दु:खाचे काळे ढग दाटून आले. प्रथम आईचे निधन झाले आणि काही दिवसांतच वडिलांचेही छत्र हरपले. कोवळ्या वयात आई-वडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या रमाई आणि त्यांच्या भावंडांचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांच्या नातेवाईकांनी घेतली. त्यांना मुंबईला आणण्यात आले. भायखळा मार्केटमधील एका चाळीत त्यांचे वास्तव्य झाले. अशा परिस्थितीत त्यांचे बालपण जगण्याच्या संघर्षात हरवून गेले.

याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर आपल्या सुपुत्रासाठी योग्य वधूच्या शोधात होते. रमाईबद्दल समजताच त्यांनी त्यांना पाहिले आणि भीमरावांसाठी पसंत केले. भायखळा मार्केटमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला. त्या वेळी भीमरावांचे वय अवघे चौदा वर्षे, तर रमाईंचे वय फक्त नऊ वर्षे होते. ना झगमगती रोषणाई, ना मोठा थाटमाट, ना पंचपक्वान्ने — अत्यंत साधेपणाने झालेला हा विवाह पुढे भारतीय इतिहासातील एका महान परिवर्तनाच्या पायाभरणीचा साक्षीदार ठरला.

विवाहानंतर रमाईंच्या आयुष्याचा संघर्ष अधिकच वाढला. बाबासाहेबांचे शिक्षण, त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा आणि समाजासाठीचे मोठे ध्येय यासाठी रमाईंनी स्वतःच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण अर्पण केला. त्या फक्त पत्नी नव्हत्या; त्या बाबासाहेबांच्या संघर्षयात्रेतील निःशब्द सहप्रवासी होत्या. बाबासाहेब परदेशात उच्च शिक्षणासाठी गेले असताना घराची संपूर्ण जबाबदारी रमाईंवर होती. घरात गरिबी, लेकरांचे आजारपण, संसाराचा भार आणि एकाकीपणा — हे सर्व त्यांनी अत्यंत धैर्याने पेलले.

१९२३ साली बाबासाहेब लंडनला शिक्षणासाठी गेले तेव्हा रमाईंची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. अनेक दिवस उपाशीपोटी राहण्याची वेळ येत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या हालअपेष्टा पाहून काही पैसे जमा करून त्यांना मदत देऊ केली. पण रमाईंनी अत्यंत नम्रपणे ती मदत नाकारली. त्या स्वाभिमानी होत्या. गरिबीने झिजवलं, दुःखाने पोखरलं, पण स्वाभिमानाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. हा स्वाभिमानच बाबासाहेबांच्या विचारांचा प्रतिबिंब होता.

घर चालवण्यासाठी रमाईंना शेणगोवऱ्या वेचाव्या लागत. बॅरिस्टर पतीची पत्नी शेणगोवऱ्या गोळा करते, असे लोक नावे ठेवतील म्हणून त्या पहाटे अंधारात उठून हे काम करत. हा प्रसंग केवळ त्यांच्या दारिद्र्याचा दाखला नाही; तो त्यांच्या त्यागाचा आणि संसार टिकवण्यासाठीच्या निर्धाराचा पुरावा आहे. त्या स्वतः झिजत होत्या, पण बाबासाहेबांच्या शिक्षणात आणि ध्येयपूर्तीत कुठेही अडथळा येऊ दिला नाही.

रमाईंच्या आयुष्यात दुःखाचे सावट कायम होते. लहानपणी आई-वडिलांचा मृत्यू, नंतर सासरे सुभेदार रामजी आंबेडकर यांचे निधन, बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव यांचा मृत्यू, मुलगा गंगाधरचा मृत्यू, १९२१ मध्ये बाळ गंगाधरचा मृत्यू, १९२६ मध्ये राजरत्नचे निधन — इतके मृत्यू त्यांनी जवळून पाहिले. एका आईसाठी स्वतःच्या लेकरांचे जाणे ही असह्य वेदना असते; पण रमाईंनी या साऱ्या आघातांना न डगमगता तोंड दिले.

त्यांच्या आयुष्याचे सार म्हणजे त्याग, सहनशीलता, समजूतदारपणा आणि नि:स्वार्थ प्रेम. बाबासाहेबांनी समाजातील कोट्यवधी शोषित-पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी जे कार्य केले, त्यामागे रमाईंचे मौनातील योगदान अनमोल आहे. बाबासाहेबांनी समाजक्रांतीचा दीप प्रज्वलित केला; पण त्या दीपासाठी तेल होऊन जळणाऱ्या रमाई होत्या.

अत्यंत कष्टमय जीवनामुळे रमाईंची प्रकृती खालावत गेली. जानेवारी १९३५ पासून त्यांचा आजार बळावला. बाबासाहेबांनी त्यांच्या उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. नामांकित डॉक्टरांना बोलावले, औषधोपचार केले, स्वतः फळांचा रस, चहा, कॉफी देत त्यांची सेवा केली. पण शरीराने साथ सोडली होती.

२७ मे १९३५ रोजी रमाईंची प्राणज्योत मालवली. बाबासाहेबांसाठी हा अत्यंत मोठा आघात होता. त्यांच्या पार्थिवाजवळ बसून बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळजवळ तीस वर्षे सुख-दुःखात सोबत करणारी, संघर्षाच्या प्रत्येक वादळात खंबीर उभी राहणारी त्यांची जीवनसाथी त्यांना सोडून गेली होती. हिमालयाएवढ्या उंच व्यक्तिमत्त्वाला आधार देणारी सावली नाहीशी झाली होती.

माता रमाईंचे जीवन हे केवळ एका महान व्यक्तीची पत्नी म्हणून नव्हे, तर त्याग, सहनशीलता आणि समर्पणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून स्मरणात राहावे. त्यांचा त्याग हा इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला पाहिजे. त्यांनी कधीही प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही; पण त्यांच्या नि:शब्द समर्पणामुळेच बाबासाहेबांना आपल्या ध्येयासाठी अखंड झगडता आले.

आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण केवळ त्यांना अभिवादन करून थांबू नये, तर त्यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी. संकटांना न डगमगता सामोरे जाणे, स्वाभिमान जपणे, कर्तव्यनिष्ठ राहणे आणि मोठ्या ध्येयासाठी स्वतःचे सुख बाजूला ठेवणे — हीच माता रमाईंच्या जीवनाची शिकवण आहे.

हिमालयाची सावली बनून महामानवाच्या कार्याला बळ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

आणखी वाचा