टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय; तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर नाव

न्यूझीलंडवर 96 धावांनी मात: जसप्रीत बुमराह बनला टी-20 विश्वचषकाचा बादशहा

अहमदाबाद, दि. ०९ : भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत न्यूझीलंडचा 96 धावांनी दणदणीत पराभव करत विजेतेपद पटकावले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी रंगलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने सर्वच आघाड्यांवर वर्चस्व गाजवत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयामुळे भारत सलग दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा आणि तीन वेळा ही स्पर्धा जिंकणारा जगातील पहिला संघ ठरला आहे.

अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत कीवी गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. सलामीपासूनच भारताने धडाकेबाज फलंदाजी करत 20 षटकांत 256 धावांचा डोंगर उभा केला. एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ पूर्णपणे दबावाखाली आला आणि अखेर 19 षटकांत 159 धावांवर सर्वबाद झाला.

भारतीय डावात संजू सॅमसन हा पुन्हा एकदा संघाचा मुख्य नायक ठरला. त्याने अवघ्या 46 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 89 धावांची झंझावाती खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे भारताला भक्कम धावसंख्या उभारता आली. त्याला युवा फलंदाज अभिषेक शर्माची चांगली साथ मिळाली. अभिषेकने फक्त 21 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावा करत शानदार अर्धशतक झळकावले.

https://x.com/ICC/status/2030704514232430685

याशिवाय इशान किशननेही आक्रमक फलंदाजी करत 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 54 धावांची खेळी केली. या तिघांच्या दमदार कामगिरीमुळे भारताची धावसंख्या वेगाने वाढत गेली. एकवेळ भारत 270 धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत होते; मात्र कर्णधार सूर्यकुमार यादव धाव न करता बाद झाला. हार्दिक पांड्याने 13 चेंडूत 18 धावा केल्या, तर तिलक वर्मा 6 चेंडूत 8 धावांवर नाबाद राहिला.

डावाच्या शेवटच्या षटकांत शिवम दुबेने तुफानी फटकेबाजी करत भारताला आणखी बळ दिले. त्याने केवळ 8 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 26 धावा केल्या. विशेषतः शेवटच्या षटकात भारताने 24 धावा काढत न्यूझीलंडसमोर 256 धावांचे आव्हान ठेवले. न्यूझीलंडकडून जेमी नीशमने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

256 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. फिन अ‍ॅलन 31 धावांवर बाद झाला, तर रचिन रवींद्र फक्त 1 धाव करून माघारी परतला. त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमनही स्वस्तात बाद झाल्याने न्यूझीलंडची अवस्था बिकट झाली.

सलामीवीर टिम सायफर्टने मात्र धैर्याने फलंदाजी करत संघाला सावरायचा प्रयत्न केला. त्याने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह 52 धावा केल्या. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. भारताच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स घेत न्यूझीलंडचा डाव कोसळवला. अखेर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 19 षटकांत 159 धावांवर बाद झाला.

भारतीय गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट कामगिरी करत 4 षटकांत फक्त 15 धावा देत 4 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, जेम्स नीशम आणि मॅट हेन्री यांना बाद केले. या कामगिरीमुळे बुमराह टी-20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज ठरला. त्याने लसिथ मलिंगाचा विक्रम मागे टाकत 40 विकेट्सचा टप्पा गाठला.

या विश्वचषक विजयामुळे भारताने तीन मोठे विक्रम आपल्या नावावर केले. सर्वप्रथम, भारत सलग दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ ठरला. दुसरे म्हणजे, तीन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला संघ बनला. यापूर्वी इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी दोन वेळा ही स्पर्धा जिंकली होती. तिसरा विक्रम म्हणजे, घरच्या मैदानावर टी-20 विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला.

या विजयानंतर भारतीय संघावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संघाचे अभिनंदन करत हा विजय देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत टीम इंडियाचे कौतुक केले. “आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन. हा विजय कौशल्य, जिद्द आणि संघभावनेचे उत्तम उदाहरण आहे,” असे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही टीम इंडियाला सलाम करत संपूर्ण स्पर्धेत संघाने दाखवलेल्या उत्साहाचे कौतुक केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही भारतीय संघाच्या कामगिरीचे अभिनंदन करत विशेषतः संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह यांच्या योगदानाचे कौतुक केले.

या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने गौरवण्यात आले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर-8 सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत त्याने सलग तीन अर्धशतके झळकावत संघाला विजयाच्या मार्गावर नेले. अंतिम सामन्यानंतर संजूने सांगितले की, खराब फॉर्ममध्ये असताना क्रिकेटचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी त्याला मार्गदर्शन केले होते.

संजू म्हणाला, “हा विश्वचषक जिंकणे स्वप्नवत वाटत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी सचिन सरांशी सतत संपर्कात होतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला आत्मविश्वास मिळाला.”

भारताच्या या ऐतिहासिक विजयामुळे देशभरात आनंदाचा उत्सव साजरा करण्यात आला. क्रिकेटप्रेमींनी रस्त्यावर उतरून फटाके फोडत आणि जल्लोष करत टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीचा आनंद साजरा केला. भारतीय क्रिकेट इतिहासात हा विजय आणखी एक सुवर्ण अध्याय म्हणून नोंदवला गेला आहे.

आणखी वाचा