विधवा प्रथा हा एक अत्याचार आहे त्याला विरोध करायला शिका- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले

चिपळूण, दि. १० (प्रतिनिधी) : मातोश्री लक्ष्मीबाई स्मृती मंच खेरशेत, चिपळूण तर्फे आज ”विधवा प्रथा बंद” या विषयावर काम केलेल्या आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणलेल्या, रूढी परंपरा यांना काट देणाऱ्या आणि विधवा स्त्रियांना समाजात सर्व नागरिकांसारखा मान आहे असं ठासून सांगणाऱ्या ग्रामपंचायतीचा सन्मान चिपळूण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे करण्यात आला. या शिवाय काही सामाजिक संस्था, महिला बचत गट आणि समाज सेवक यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री लक्ष्मीबाई स्मृती मंचचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांनी केले होते. यावेळी मुख्य प्रव्यक्त्या म्हणून रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले आणि दैनिक रत्नभूमीच्या मालक/संपादिका श्रीमती धनश्री पालांडे उपस्थित होत्या.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने आणि राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून स्त्री मुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणे बाबतच्या ठरावानुसार पुरोगामी विचारांचा वारसापुढे नेण्याच्या दृष्टीने कृतीशील कार्यवाहीच्या माध्यमातून गेली २८ वर्ष सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण व एड्स या क्षेत्रात कार्यरत असलेली चिपळूण तालुक्यातील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्यावतीने २०२४ मध्ये अनिष्ट विधवा प्रथा बंद ‘माझे मत’ राज्यस्तरीय लेखन स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे चिपळूण तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींमार्फत अनिष्ट विधवा प्रथा बंदच्या आदेशाची अंमलबजावणी करून विधवा महिलांच्या सन्मानाकरिता सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविले आहेत अशा ११ ग्रामपंचायती, तसेच विधवा महिला बचतगटांना, महिला मंडळांना आणि सामाजिक कार्यकर्तींना ”स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान २०२३” आणि ‘माझे मत’ लेखन स्पर्धेतील विजेत्यांना ”युगनायिका सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती लेखणी सन्मान २०२३” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या पुरस्कार वितरणाच्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले की, विधवा प्रथा बंद हा विषय समाज जागृतीसाठी पुढे आला पाहिजे. असा विचार प्रत्येक घरा घरात रूजला पाहिजे. इतकेच नाही तर प्रत्येक महिलेनी स्वतः मध्ये विश्वास ठेवायला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून पुढे जाण्याची गरज आहे. हे सर्व करत असताना त्यांनी समाजातील गरीब आणि वंचित लोकांना गरजेच्या वेळेस मदत करा असे आवाहनही डॉ. फुले यांनी केले. कोणीही स्वतःला अबला समजू नका. विधवा प्रथा हा एक अत्याचार आहे. त्याला विरोध करायला शिका. ज्या ग्रामपंचायतीनी या प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांचे डॉ. फुले यांनी आभार मानले आहेत.

यावेळी बोलताना धनश्री पालांडे यांनी सांगितले की, विधवा होणं, स्त्रीच्या अंगावरील दागिने उतरवणं आदी गोष्टिना स्वतः स्त्रीने विरोध केला आणि आपल्या मुलांसाठी ती जर ठामपणे समाजासमोर उभी राहिली तर तिच्याकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही. आजची पिढी या अश्या सर्व प्रकारांना विरोध करताना दिसत आहे. शिक्षित समाजात या गोष्टिंना थारा नाही. त्यामुळे शिक्षणाचा प्रभाव अश्या रूढी आणि परंपरा यांना संपवण्यासाठी नक्कीच प्रयन्त केला गेला पाहिजे.
याशिवाय रत्नागिरी सिव्हीलचे अतिरीक्त आरोग्य अधिकारी डॉ. गावडे आणि या संस्थेचे सर्वेसर्वा संजय कदम यांनीही आपले या विषयावरील मत मांडले आहेत.
आपल्या गावातील अश्या विधवा प्रथा बंद पाडण्यात यश मिळवलेल्या अकरा ग्रामपंचायतींचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्यात नाणीज (रत्नागिरी), मुरादपूर (संगमेश्वर), उमराटखुर्द (गुहागर), नारडुवे (संगमेश्वर), भिले (चिपळूण), आबलोली (गुहागर), पानवल (रत्नागिरी), भडकंबा (संगमेश्वर), तेन्येवायंगणी (दापोली), पाचाड (चिपळूण), वरवेली (गुहागर) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तीन सामाजिक संस्था ज्यांनी या प्रथा बंद करण्यात याव्यात म्हणून प्रयत्न केले त्यांना आयडॉल ऑफ रत्नागिरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यात प्रथम नाचणे येथिल कुणबी समाज सेवा संघ, पालवी प्रतिष्ठान धोपेश्वर राजापूर आणि जुवाठी राजापूर येथील संस्थांचा समावेश आहे.

महिला बचत गटातर्फेही असे प्रयत्न करतानाचे प्रयत्न दिसून आले आहेत. त्यात आनंदी महिला बचत गट, पाचाड चिपळूण या महिलांनी विशेष प्रयत्न केल्याने त्यांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे. समाजसेवक म्हणून मारुती काका जोयशी यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.

या संस्थेतर्फे राज्यस्तरीय लेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचे परिक्षण श्रीमती धनश्री पालांडे आणि अँड. रजपूत यांनी केले होते. दहा क्रमांक यातून काढण्यात आले होते. त्यांना यावेळी पुरस्कृत करण्यात आले. अनुक्रमे हे क्रमांक आहेत. डॉ. राजेश जोशी, सातारा, अंकीता पंडित चिखली, संतोष कुळे काविळतळी, दत्ताराम सावरकर कोळकेवाडी, मिरा देके छत्रपती संभाजी नगर, विकास खराते लातूर. ज्योती वराळे साडवली, जयंत चव्हाण दापोली, सौ. सिद्धी चिंचवलकर देवरूख, श्रावणी सणस टालसुरे यांचा समावेश आहे.

आणखी वाचा