रोजगार वाचवण्यासाठी रत्नागिरीत माथाडी कामगार आक्रमक; दोन दिवसांचे धरणे आंदोलन सुरू

रत्नागिरी, दि. २६ : शासकीय धान्य गोदामांमधील माथाडी कामगारांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या शासन निर्णयाविरोधात रत्नागिरीत माथाडी कामगारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतीय माथाडी सुरक्षा रक्षक श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

शासकीय धान्य गोदामांमध्ये अनेक वर्षांपासून धान्याची भराई-उतराई, मोजमाप तसेच रास्तभाव दुकानांपर्यंत पोहोचविण्याची कामे माथाडी कामगारांकडून केली जात आहेत. मात्र शासनाने आता धान्य थेट दुकानदारांच्या ठिकाणी उतरविण्याचा निर्णय घेतल्याने ही कामे वाहतूकदारांच्या माध्यमातून अ-नोंदणीकृत खासगी कामगारांकडून करून घेतली जाणार आहेत.

या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १५० माथाडी कामगारांच्या रोजगारावर गंडांतर आले असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी ठाम मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

याशिवाय, मजुरी व लेवीची रक्कम संबंधित कंत्राटदारांकडून माथाडी मंडळाकडे वेळेत जमा होत नसल्याने आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात प्रशांत पालकर, अशोक सूर्यवंशी, संतोष घडशी यांच्यासह मोठ्या संख्येने माथाडी कामगार सहभागी झाले आहेत.

आंदोलनकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत आपल्या मागण्या मांडल्या आहेत. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास २७ मेपासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

जिल्हा प्रशासनाने आंदोलकांचे निवेदन शासनाकडे तात्काळ पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

आणखी वाचा