Coffee Day : गोष्ट कॉफीच्या जन्मापासून ते भारतातील व्यापारवृद्धीपर्यंत

चहा म्हणजे भारतीयांचं प्रेम, जीव की प्राण असं अमृतच. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र कॅफे कल्चरच्या निमित्ताने कॉफी सेवनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येतं. चहाप्रमाणेच कॉफीही मूड रिफ्रेश करते. मिलेनियल, जेन झी, जेन वाय हे मुख्यत्त्वे कॉफी लव्हर असल्याचं निरीक्षणांतून दिसतं. हेच वाढतं कॉफीचं सेवन पाहता, मेट्रो शहरांतील प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात कॅफेज सुरू आहेत, तर टिअर टू, टिअर थ्री शहरांतही कॅफे कल्चर जोमात सुरू असल्याचं दिसतं आहे. त्यात सर्व कार्यालयांमध्ये हमखास कॉफी मशिन असतं ज्यामुळे एकदा तरी कॉफी पिणं होतच. यासह सोशल मिडियावर फूड संदर्भातील कॉन्टेंट ट्रेडिंगमध्येच असतोच अन् त्यात डॅल्गॉना कॉफी, कॅफे स्टाईल कॉफी, फ्रॅपे घरच्या घरी बनवा ते व्यवसाय सुरू करा आदी गोष्टी पाहावयास मिळतात.  त्यामुळे कॉफी कल्चर हळूहळू भारतीयांमध्ये रुळू लागलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

मंडळी, १ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय कॉफी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. कॉफी हे पेय आपण पाश्चात्य मानतो खरं पण ते पश्चिमी नाहीच मुळी, ते भारतात आलं अरबस्थानातून, पण याचा जन्म झाला तो इथिओपीआ देशात म्हणजेच आताच्या पूर्व आफ्रिकेमध्ये. केसिया अरेबिका या वृक्षाच्या बिया फरमेंट करून भाजून यापासून कॉफी बनवतात. ही प्रक्रिया चॉकलेट बनवण्याच्या पद्धतीशी साधर्य्य आहे. भारतामध्ये कॉफीचे उत्पादन विशेषतः दक्षिण भारतामध्ये होते मैसूर, उटी, बंगळुरू, केरळ या प्रदेशात. तसंही आपल्याकडे दाक्षिणात्य फिल्टर कॉफी खूपच प्रसिद्ध आहे. साऊथ इंडियन हॉटेलात गेल्यावर हमखास काफी ऑर्डर करण्याची प्रथाच आहे. दक्षिणेतील पर्वताच्या रांगेत कॉफीच्या वृक्षांची लागवड केली जाते. चांगल्या कसदार जमिनीमध्ये कॉफीच्या वृक्षांच्या बागा फुलवल्या जातात.

कॉफी भारतात येण्यामागील गोष्ट (Who introduced coffee beans to India?)
How Does Coffee Bean Size Affect Your Brew's Flavor? – Japanese Coffee Co.
केसिया अरेबिका झाडाची फळे म्हणजे कॉफीच्या बियांचं मूळ रुप. फोटो साभार: गुगल
तब्बल ३० लाख वर्षांपूर्वीचे पुरतत्त्वशास्त्रीय पुरावे प्राचीन इथिओपीयन संस्कृतीबाबत सापडले आहेत. येथील संस्कृती, इतिहास अतिप्राचीन आहेच पण हे ठिकाण आहे जेथे कॉफीचा जन्म झाला. आजही इथिओपीआ जगातील टॉप कॉफी उत्पादक देश आहे. इथोपिआयामधील काल्डी या शेळी पालकाने कॉफीचा शोध लावला असे संदर्भ ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात. काल्डी हा शेळी पालक शेळ्यांना रोज विविध ठिकाणी चरण्यासाठी नेत असे. जेव्हा शेळी विशिष्ट झाडावरील लहानगी बोरांसारखी लाल फळे खात तेव्हा, त्या अधिक उत्साही होऊन जात असे, त्या झोपत नसे, अधिक जोमाने खेळू लागे. मग काल्डीने स्वत: ती फळे खाल्ल्यावर त्यालाही तोच अनुभव आला. मग ही फळे घेऊन तो एका साधुकडे गेला. साधुंनादेखील फळे चाखल्यावर तोच अनुभव आला. मग त्या दोघांनी काही प्रयोग करून पाहिले. त्यांनी ती फळे उकळवली, भाजून पाहिली, मग त्यांनी यांना फरमेंट करून सुकवले, भाजले आणि ते पाण्यात मिक्स करून प्यायले, अन् बनली कॉफी. निश्चितच त्या कॉफीत आणि आजच्या कॉफीत खूप अंतर आहे. पण या बेरीज् आपल्याला ताजेतवाने करतात आणि त्याचा सर्वांना लाभ घेता यावा म्हणून केलेली प्रक्रिया होती, त्यांच्यामुळेच आज संपूर्ण जगात कॉफीचा आस्वाद घेतला जात आहे, यासाठी काल्डी आणि त्या साधुंचे खरंच आभार.
History of Indian Coffee - YouTube
बाबा बुदान, सुफी संत यांचे आयच्या साहाय्याने रेखाटलेले चित्र
कॉफी ईस्ट आफ्रिकेतून अरबांकडे पोहोचली. अरबांनी याचा व्यवसाय थाटला. नुसता व्यवसाय सुरू केला नाही तर त्यावर आपली मक्तेदारीही ठेवली. अरबच संपूर्ण जगात कॉफी पोहोचवत होते. पाश्चिमात्यांना कॉफीची चटक अरबांनी लावली. मोनॉपोली असल्यामुळे अरब राज्यातून कॉफीच्या बिया (कॉफी बीन्स) घेऊन जाण्यास परवानगी नव्हती अन् ते घेऊन जाणे हा गुन्हा होता. पण तरी त्यावेळी कॉफीच्या बिया भारतात आल्या, ते एका सुफी संतामुळे. बाबा बुदान नावाचे सुफी संत हज यात्रा करून १६७० मध्ये भारतात परत येत असताना त्यांनी मोका येमेनच्या बंदरातून सात कॉफी बिन्स आपल्या बटव्यात टाकून भारतात आणल्या. अरबांना भीती होती की कॉफीच्या बिया इतर देशात पोहोचल्या तर कॉफीचं उत्पादन दुसरीकडे सुरू होईल आणि आपल्या व्यापारावर गदा येईल. म्हणून अरब केवळ उकळून किंवा भाजलेल्या बियाच निर्यात करत असत. त्यामुळे या बिया आणणं जोखमीचं होतं. बऱ्याच ग्रंथांमध्ये संत बुदान यांच्या कृत्याला स्मगलिंग असं म्हटलं गेलं आहे, मात्र भारतीयांसाठी ही खूप महत्त्वाची तसेच आयुष्य बदलून टाकणारी गोष्ट होती. त्यांच्यामुळेच आज भारतात कॉफी उद्योग सुरू आहे. तसंच संत बुदान यांनी सातच बिया आणण्यामागे असं म्हटलं जातं की इस्लाममध्ये ७ हा पवित्र अंक मानला जातो.
पुढे या सात बियांची लागवड बंगळुरूमधील चिकमंगलूर येथे केली गेली. काही वर्षांतच येथे मोठ्या प्रमाणात कॉफी उगवली आणि यास बाबा बुदान कॉफी फॉरेस्ट असं नाव पडलं. मग काय, सर्व दक्षिणेतील राज्यांमध्ये कॉफीच्या बागा फुलल्या. खरंतर त्यावेळी चहाच्या बागाही एवढ्या मोठ्या प्रमाणात उगवल्या नव्हत्या. खऱ्या अर्थाने चहाच्या बागा १८२० मध्ये फुलवण्यास सुरुवात झाली होती. प्लासीच्या लढाईनंतर भारतात पहिलं कॉफी शॉप कोलकात्यात सुरू झालं होतं. त्याकाळी कॉफीमध्ये मध टाकत असत. तर लॅक्टोजचं उच्च प्रमाण असलेली कॉफी पिणं हे श्रीमंतीचं लक्षण होतं. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात कॉफी बागा असणं हेही श्रीमंतीचं लक्षण मानलं जात होतं. १९३६ मध्ये मुंबईत सर्व प्रथम इंडियन कॉफी हाऊसची चेन उभारली गेली. १९७० पर्यंत तर भारतात कॉफी व्यवसाय. इंडस्ट्री तयार झाली.
कॉफी व्यवसायाची आजची स्थिती (Coffee business in India)
The Evolution of India's Coffee Industry - STiR Coffee and Tea Magazine | Global Business Insight on Coffee and Tea
कॉफीच्या बिया सुकवण्याची प्रक्रिया.
आज भारतात ९ लाख एकर जमिनीवर १ लाख ७१ हजार कॉफीच्या बागा आहेत. भारत जगातील सहावा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश आहे. भारतातील कॉफी उद्योग वर्षागणित १०.१५ टक्क्यांनी वाढत आहे, असे इंडिया कॉफी मार्केट: उद्योग विश्लेषण आणि अंदाज २०२२ च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तर ऑगस्ट २०२३ पर्यंत भारतात कॉफीचे सेवन मागील वर्षाीच्या तुलनेत २ टक्क्यांनी वाढले आहे. यंदा आपण १ हजार २३५ एवढ्या ६० किलोच्या कॉफीच्या बॅगचे सेवन केले आहे, ही माहिती युनायटेड स्टेट्स ऑफ अ‍ॅग्रीकल्चरच्या कॉफी अ‍ॅन्युअल रिपोर्ट ऑगस्ट २०२३ मध्ये दिली आहे. स्टॅटेस्टिका या संशोधन कंपनीच्यामते, यंदा भारताने ८८.३ युएस बिलियन महसूल जमा केला आहे. म्हणजेच २०२२ च्या तुलनेत ४.६१ टक्क्यांनी महसूल वाढला आहे. यासह २०२८ वर्षापर्यंत यात ९.०४ टक्क्यांची चक्रवाढ वार्षिक वृद्धी होण्याची शक्यता वर्तवली आहे. पाश्चिमात्य पद्धतीची भारतीय कॉफी चेन अर्थात कॅफे कॉफी डे च्या सर्व रजिस्टर्ड कॅफेजचा मार्च २०२२ ते मार्च २०२३ या वर्षात प्रत्येक दिवसाचा महसूल ४२ टक्क्यांनी वाढला आहे. तर कॅफेच्या एकूण सेल्समध्ये ५०.५९ टक्क्यांनी वृद्धी झाली आहे.
तर, एका सुफी संताने लपवून आणलेल्या ७ कॉफीच्या बियांनी काय कमाल केली आहे ना, आज कॉफी उत्पादन, पॅकेजिंग, विक्री हा किती मोठा उद्योग झाला आहे. कॉफी आपला मूड बनवते, तशी देशाच्या उद्योगात, अर्थकारणालाही हातभार लावते.

दिशा खातू, पत्रकार (मुंबई)

आणखी वाचा