रत्नागिरी, दि. २४ : शहराजवळील साईनगर परिसरात २५ वर्षीय सूरज झोरे या तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासात धक्कादायक आणि थरारक माहिती समोर आली आहे. मैत्रिणीला फितवण्याच्या संशयातून मुख्य आरोपी सोहम म्हात्रेने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने हा पूर्वनियोजित कट रचल्याचा प्राथमिक तपासात उलगडा झाला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयाने २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या हत्येमागील संपूर्ण कटकारस्थानाचा उलगडा करण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी वकील निलांजन नाचणकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. पोलिसांनी सादर केलेल्या प्राथमिक तपास अहवालानुसार, मुख्य आरोपी सोहम एकनाथ म्हात्रे (वय १८) याची गर्लफ्रेंड घटनेच्या दिवशी रत्नागिरीत त्याच्यासोबत आली होती. याचदरम्यान मयत सूरज झोरे याने त्या तरुणीशी संवाद साधत ‘म्हात्रेवर भरवसा ठेवू नकोस’ असे सांगून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब सोहमच्या कानावर पोहोचताच त्याच्या मनात संतापाची ठिणगी पडली आणि त्याने सूरजचा कायमचा काटा काढण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
ही थरारक घटना २१ मे रोजी रात्री उशिरा घडली. फिर्यादी नंदा रमेश फाले (रा. दहिसर, मुंबई) यांना रात्री १०.५३ वाजता एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने रत्नागिरीतील साईनगर परिसरात त्यांच्या भावावर काही जणांनी जीवघेणा हल्ला केल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने सूरजशी संपर्क साधला. गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देत असलेल्या सूरजने बहिणीशी बोलताना त्याच्यावर सोहम म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड (२२) आणि नजीबुल हसीबार शेख उर्फ सोनू (२१) यांनी कोयत्याने सपासप वार केल्याचे सांगितले.
https://bhairavtimes.com/breking-news-3/
जखमी अवस्थेतील सूरजला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र, मानेवर, हातावर आणि चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपींनी सूरजवर हल्ला करताना सोहमची गर्लफ्रेंड घटनास्थळी उपस्थित होती. तिच्यासमोरच तिघांनी सूरजवर कोयत्याने बेछूट वार केले. जीव वाचवण्यासाठी सूरजने पळ काढत लगतच्या एका घराच्या कंपाउंडमध्ये उडी मारून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्याचा पाठलाग करत तिथेच त्याच्यावर पुन्हा वार केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांच्या पथकाने २२ मे रोजी तिन्ही आरोपींना अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आणि न्यायालयाने ती मान्य करत आरोपींना २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, या हत्येनंतर सोहमची गर्लफ्रेंड अचानक गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. ती नेमकी कुठून आली होती, घटनेनंतर कुठे गेली आणि तिला या कटाची पूर्वकल्पना होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या मते, तिचा जबाब या संपूर्ण प्रकरणातील अनेक गूढ बाबींवर प्रकाश टाकू शकतो.
याशिवाय, हत्येसाठी वापरण्यात आलेला रक्ताने माखलेला कोयता अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरोपींनी तो कुठे लपवला, गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. आरोपी आणि मयत सूरज हे घटनेपूर्वी कुठे भेटले होते, त्यांच्यातील संभाषण काय झाले होते, याचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
हा खून केवळ प्रेमसंबंधातील वादातून झाला की त्यामागे आणखी काही आर्थिक किंवा वैयक्तिक कारणे आहेत, याचाही तपास सुरू आहे. पोलिसांच्या मते, पुढील काही दिवसांत या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. रत्नागिरी शहरात घडलेल्या या निर्घृण हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.








