मीना इंगळे नाईक : सत्तरीतही पंचवीशीतला सळसळळता उत्साह !

 ‘पाडाला पिकलाय आंबा’ या लावणीतील दिलखेचक अदा दर्शवीत रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या प्रख्यात लावणी सम्राज्ञी यांची याद तरोताजा करणारे एक व्यक्तिमत्त्व सत्तरीतही पंचवीशीतला सळसळळता उत्साह दाखवू शकते, हे आश्चर्य सौ. मीना इंगळे नाईक यांनी उच्चभ्रू समाजात दाखवून दिले आहे. मधू कांबीकर पासून सुरेखा पुणेकर यांच्यापर्यंतच्या लावणी सम्राज्ञी यांना अभिमान वाटेल असे हे व्यक्तिमत्त्व आहे. माझे वडिल आणि माझे पत्रकारितेचे विद्यापीठ वसंतराव त्रिवेदी यांच्या समवेत अनेक वर्षे कार्य केलेले आणि गेल्या पंचावन्न वर्षांपासून मी ज्यांच्या सान्निध्यात पत्रकारिता, सामाजिक कार्य करीत आहे असे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री विजय वैद्य यांच्या मुळे मला अनेक थोरामोठ्यांच्या सहवासाचा लाभ झाला. गेल्या चाळीस वर्षापासून सुरु असलेल्या विजय वैद्य यांच्या वसंत व्याख्यानमालेमुळे अनेकांची ‘डिस्क्व्हरी’ झाली आहे. किंबहुना अनेक मोठमोठ्या व्यक्ती माझ्या आयुष्यात येऊन त्या माझ्या परिवारातील एक घटक बनल्या आहेत. अशाच एका उत्तुंग व्यक्तिमत्वावर मी माझ्या भावना व्यक्त करीत आहे. मी १९ ऑक्टोबर २०१३ रोजी दैनिक सामना मधून पंचवीस वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालो. आज वयाच्या अडुसष्टाव्या वर्षीही माझी पत्रकारिता सुरु आहे.

रोज विविध सांस्कृतिक सामाजिक राजकीय बातम्या माझ्या पत्रकार बांधवांकडे पाठवीत असतो. अशाच प्रकारे एक बातमी वृत्तपत्रात पाठविली. अर्थात विजय वैद्य यांच्या शिफारशीनुसार अनेक जण माझ्याकडे माहिती पाठवित असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची ओळख लगेच होते असे नाही. कालांतराने त्या त्या व्यक्तींची ओळख होते. ख्यातनाम स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे आपल्या लाडक्या लतादीदी आपल्यातून, इहलोकीची यात्रा संपवून स्वर्गलोकी निघून गेल्या. लतादीदी यांच्या महानिर्वाणानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष कुणाल माईणकर यांनी एक छोटेखानी श्रद्धांजली कार्यक्रम बोरीवली पूर्व येथील दत्तपाडा मार्ग येथे आयोजित केला होता. अनेक मान्यवरांप्रमाणे कुणाल माईणकर यांनी मला सुद्धा बोलावले होते. दीदींच्या भव्य प्रतिमेसमोर प्रणाम करुन व्यासपीठावरुन खाली उतरत असताना एक भारदस्त व्यक्तिमत्व समोर उभे राहिले. बातम्या देत असतांना छायाचित्र पाहिले होते. त्यामुळे मी पटकन त्या भारदस्त व्यक्तिमत्वाला, मी योगेश वसंत त्रिवेदी असा परिचय करून दिला. ओ हो, आपणच कां ? आमच्या बातम्या देणारे पत्रकार ! बरं वाटलं, भेट झाली. हे भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे मीना इंगळे नाईक. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. विजय वैद्य वास्तव्यास असलेल्या जय महाराष्ट्र नगर येथील वास्तव्यानंतर त्या आमच्या जवळच्या कंट्री पार्क या इमारतीत वास्तव्यास आल्या. बरीच वर्षे झाली. गप्पा गोष्टी करत असतांनाच मीनाताईंचे व्यक्तिमत्त्व उलगडत गेले आणि आपण किती मोठ्या मान्यवर व्यक्तीच्या सान्निध्यात आलो याची अनुभूती, प्रचिती आली.

मीनाताई या एअर इंडिया मधून प्रदीर्घ काळ सेवा बजावून निवृत्त झाल्या आहेत. एअर इंडियामध्ये महत्वाच्या, अती महत्वाच्या व्यक्तींना बोर्डिंग पास, सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आपल्या मधाळ, रसाळ वाणीने मीनाताई इंगळे नाईक यांनी अत्यंत बखूबीने निभावली. यातूनच मग प्रख्यात उद्योगपती परंतु निगर्वी व्यक्तिमत्त्व असे रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी, अनिल अंबानी, अभिनेत्री माधुरी दीक्षित, श्रीदेवी, प्रख्यात मराठी अभिनेते दादा कोंडके, सूर्यकांत, चंद्रकांत, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी मोने, राजकीय नेत्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या पासून अनेक नेते मीनाताई इंगळे नाईक यांच्या संपर्कात आले. अनेक जण तर मीनाताई व्हीआयपी लॉंज सेवेत आहेत कां याची खातरजमा करुन विमानतळावर येत असत. फार वर्षांपूर्वी रतन टाटांनी मीनाताई इंगळे नाईक यांच्या सेवेवर खुश होत भेट म्हणून शंभर रुपयांची नोट स्वतः स्वाक्षरी करुन दिली.

मीनाताई यांनी ही नोट आठवण म्हणून लॅमिनेट करुन ठेवली असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रुचिरा दिघे यांच्या अधिपत्याखालील ज्येष्ठ नागरिक संघाच्या एका कार्यक्रमात बोलतांना नमूद केले आहे. प्रख्यात माध्यम तज्ज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांनी मीनाताई इंगळे नाईक यांची युट्यूबवर मुलाखत घेतली होती त्यातूनही मीनाताई इंगळे यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख समाजासमोर प्रकर्षाने आली आहे. दादा कोंडके, सूर्यकांत, चंद्रकांत यांच्या समवेत मीनाताई यांचे भावाबहिणी सारखे नाते तयार झाले. दादा कोंडके यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असतांनाच मीनाताई त्यांच्यासाठी खास खाऊ घेऊन जात असत तेंव्हा, अगं मीना, हे इतके चविष्ट पदार्थ तू कुठून आणते ? असा प्रश्न आवर्जून दादा विचारीत. अर्थात मीनाताई वेळ मारुन नेत असत. सुकन्या कुलकर्णी मोने या तर मीनाताई इंगळे नाईक यांच्या खास मैत्रीण झाल्या आणि त्यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुद्धा हजेरी लावून कार्यक्रमाला चार चांद लावले. मीनाताई इंगळे नाईक हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. मधू कांबीकर या ख्यातनाम नृत्यांगना आणि लावणी सम्राज्ञी आणि मीनाताई इंगळे नाईक यांचा पारिवारिक संबंध आहे. एअर इंडियाच्या सांस्कृतिक विभागाची बरीच वर्षे त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी भूषविली आहे.

या अनुषंगाने मीनाताई यांनी विविध देशांचे पर्यटन केले आहे. विशेषतः मॉरिशसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि अशोक कुलकर्णी सारखे दिग्गज त्यांच्या सान्निध्यात आले. मोटार ड्रायव्हिंग हा तर त्यांचा डाव्या हातचा मळ. लांब पल्ल्याचा वाहन चालविण्याच्या त्या भारी शौकीन आहेत. सातारा सांगली या आपल्या जन्मभूमी असलेल्या आवडत्या भागात नेहमी त्या स्वतः मोटार चालवीत जात असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. मीनाताई या उत्कृष्ट गायिका असल्याचे आम्हाला अचानक एका कार्यक्रमाद्वारे समजले. अशोक परब हे शिवसेनेचे बोरीवली पूर्व येथील शाखाप्रमुख. पण अशोकरावांनी राजकारणा व्यतिरिक्त सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा आपला ठसा उमटवला आहे. कराओके नावाच्या गाण्यांच्या क्लासच्या माध्यमातून त्यांनी आपले सहकारी निलेश माळी यांच्या सहकार्याने मीनाताई इंगळे नाईक, दिनेश विचारे, संजय कानडे यांच्यासमवेत अनेकांना संधी उपलब्ध करुन दिली आहे. बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात त्यांचे कार्यक्रम पाहण्याचा योग आला. जुनी मराठी आणि हिंदी गाणी त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळाली आणि त्यायोगे कर्णकुंडले तृप्त झाली. काडसिद्धेश्वर स्वामींचा कृपाशीर्वाद लाभला ! मीनाताई इंगळे नाईक यांना कोल्हापूर जिल्ह्यातील प्रख्यात अध्यात्ममार्गी सद्गुरु श्री काडसिद्धेश्वर स्वामींचा कृपाशीर्वाद लाभला आहे. विकासासाठी अव्याहत झटणारे आमदार महेश शिंदे यांच्या सान्निध्यात आल्यानंतर मीनाताई या अचानक परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी गेल्या. सरळमार्गी आणि परखड स्वभावाच्या मीनाताई इंगळे नाईक या काडसिद्धेश्वर स्वामींच्या मठात पोहोचताच प्रथमदर्शनीच त्यांनी स्वामींच्या पायावर माथा टेकविला. स्वामींच्या समोर कुणीही बोलण्यास धजावत नाही, परंतु निरागस स्वभावाच्या मीनाताई त्यांच्या समोर बोलत्या जाहल्या. लोक आश्चर्य चकीत झाले. परंतु स्वामींना त्यांचा स्वभाव आवडला. कुणी काही सांगण्यापूर्वीच मीनाताई यांनी स्वामींच्या मठात आपापल्या परीने सेवा बजावली.

मीनाताई यांना चिकुनगुनिया झाला असतांना आणि तो लवकर बरा होत नाही हे माहित असतांनाही स्वामी अचानक मीनाताई इंगळे नाईक यांच्या निवासस्थानी भोजनासाठी आले. हात पाय चालत नसतांना अन्नपूर्णेचा आशीर्वाद आणि स्वामींच्या कृपाशीर्वादाने सुमारे पंचवीस जणांचा स्वयंपाक करून स्वामी आणि सेवक अशा सर्वांना साग्रसंगीत भोजन वाढले. चिकुनगुनिया एकदमच गायब झाला. ही ईश्वरी देणगीच म्हणावी लागेल. स्वामींच्या मठासाठी मदत किती आणि कशी केली याची मोजदाद न केलेलीच बरी. अत्यंत दुर्धर आजाराने त्रस्त झालेल्या मीनाताई यांना स्वामींच्या कृपाशीर्वादाने वाचविले असे त्या अभिमानाने सांगतात.   एक निगर्वी, अजातशत्रू अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या मीनाताई इंगळे नाईक यांची जन्मतारीख मुंबई महाराष्ट्र भारत नव्हे तर संपूर्ण जगाला लक्षात राहील अशी आहे. २६ नोव्हेंबर ही मीनाताई इंगळे नाईक यांची जन्मतारीख. याच दिवशी २००८ साली मुंबईत अतिरेक्यांनी हल्ला केला आणि अनेक निरपराध लोकांचे तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे या हल्ल्यात बळी गेले. हा तारखेचा विचित्र योगायोग असला तरी मीनाताई इंगळे नाईक या सुमारे ६९ वर्षापूर्वी २६ नोव्हेंबर रोजी या पृथ्वीतलावर अवतरल्या. वयाच्या सत्तराव्या वर्षीही पंचवीशीचा सळसळता उत्साह त्यांच्यात दिसून येतो. आपल्या निवासस्थानाच्या  सांस्कृतिक कार्यक्रमात तसेच रंगमंचावर ‘पाडाला पिकलाय आंबा’ या फर्मास लावणीतून त्यांनी आपली दिलखेचक अदा दर्शवीत रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवले. ड्रायव्हिंग, स्विमिंग, पेंटिंग, पाक कला 100 लोकांसाठी वसाहतीत क्रिकेट मॅचसाठी जेवण बनवणे छंद असे एक जबरदस्त सर्वपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या, सळसळत्या चैतन्याचा धबधबा अशा मीनाताई इंगळे नाईक यांचा उत्साह, कामाचा झपाटा तरुणांना लाजवेल असा आहे.

मानसिक, शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वार्थाने ‘फिट्ट’ असलेल्या मीनाताई इंगळे नाईक यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो या मनापासून शुभेच्छा.

  • – योगेश वसंत त्रिवेदी, (ज्येष्ठ पत्रकार, मुंबई)
  • (yogeshtrivedi55@gmail.com/ 9892935321)

आणखी वाचा